भक्तांच्या श्रद्धेनुसार नाथ नंगे महाराज हे आद्यनाथ मत्स्येंद्रनाथांच्या परंपरेशी संबंधित मानले जातात. त्यांच्या समाधीस्थळी भक्त दर्शन, पूजन आणि नामस्मरणासाठी येतात.
नाथ नंगे महाराज हे नाथपंथातील योगी होते. भारतात आठव्या ते बाराव्या शतकाच्या काळात नाथ संप्रदायाचा उदय झाला. मत्स्येंद्रनाथ हे या संप्रदायातील पहिले पुरुष मानले जातात. मत्स्येंद्रनाथ यांची मच्छिंद्रनाथ, मच्छेंद्रपाद, मच्छघ्नपाद, मीनपाद आदी विविध नामरूपे विविध ग्रंथांत आढळतात. मत्स्येंद्रनाथ यांचे मूलस्थान अज्ञात आहे.
थोर संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या मते मत्स्येंद्रनाथ यांचा काळ इ.स. १०१५ पूर्वीचा आहे. त्यांच्या नावावर ‘कौलज्ञाननिर्णय’, ‘अकुलवीरतंत्रम्’, ‘कुलानंदतंत्रम्’, ‘ज्ञानकारिका’, तसेच ‘योगविषय’, ‘मत्स्येंद्रसंहिता’ असे ग्रंथ आहेत. यातील पहिले चार ग्रंथ हे कौलमताचे ग्रंथ आहेत.
नाथ नंगे महाराज हे मत्स्येंद्रनाथांचे अवतार गणले जातात. नाथ नंगे महाराजांचा पूर्वेतिहास अज्ञात आहे. ते अयोनिज असल्याची भक्तांची धारणा आहे.
नाथ नंगे महाराजांबाबतची आख्यायिका
त्यांच्याबाबत आख्यायिका अशी की साधारण १०० वर्षांपूर्वी डव्हा गावात मारुतीच्या पारावर दिगंबरावस्थेत बसलेली एक अनोळखी वृद्ध व्यक्ती गावकऱ्यांना दिसली. या भागात येण्याआधी मालेगाव तालुक्यातील जौळका या गावातील अवलिया संस्थान या ठिकाणी ते राहात असत. सडपातळ देह, दोन्ही डोळ्यांनी अंध, पायाने पांगळे, काळासावळा रंग असलेले हे ७५ वर्षीय गृहस्थ दिगंबरावस्थेत असल्याने गावकरी त्यांना सुरुवातीला ‘नंग्या’ या नावाने संबोधत. त्यांचा निवास सहसा मारुतीच्या पारावरच असे. तेथेच त्यांनी धुनी पेटवली होती.
भक्तपरंपरेनुसार त्या धुनीच्या राखेद्वारे रोग्यांचे व्याधी दूर करणे, चोरी गेलेल्या गायी वा वस्तू शोधून देणे, मुक्याला बोलायला लावणे, कुष्ठरोग बरा करणे असे काही चमत्कार त्यांनी करून दाखविले. यामुळे ते एक साक्षात्कारी पुरुष असल्याचे लोकांच्या लक्षात आले. हळूहळू त्यांचे भक्तगण वाढू लागले. विश्वनाथ महाराज हे त्यांचे पट्टशिष्य होते.
असे सांगण्यात येते की सुमारे १२ वर्षे नाथ नंगे महाराज यांनी विश्वनाथ महाराज यांना सर्व कसोट्यांवर आजमावून पाहिले. त्यानंतर त्यांनी आपल्या अवतार समाप्तीची घोषणा केली व त्यानुसार समाधी घेतली. असेही सांगितले जाते की त्यांनी विश्वनाथ महाराज यांच्या देहामध्ये प्रवेश केला. रथसप्तमीच्या दिवशी हा परकाया प्रवेश झाल्यामुळे तेव्हापासून डव्हा येथे रथसप्तमीस भव्य जत्रा भरते. एकूण सात दिवस हा जत्रोत्सव सुरू असतो.
विश्वमंदिर – समाधी मंदिर
नाथ नंगे महाराजांच्या समाधी मंदिराची मोठी वास्तू विश्वमंदिर म्हणून ओळखली जाते. हे मंदिर जुने व दगडात बांधलेले आहे. मंदिरास छोटेखानी कमानदार प्रवेशद्वार असून येथून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात रुंदसर चौकोनाकार स्तंभ आहेत; ते मोठ्या कमानींनी एकमेकांस जोडलेले आहेत.
येथून पुढे चार-पाच पायऱ्या चढून वर गेल्यावर नाथ नंगे महाराजांच्या समाधीस्थानाचे प्रवेशद्वार आहे. समोरच त्यांच्या चांदीच्या पादुकांचे स्थान आहे. पुढे गाभाऱ्यामध्ये चांदीचे नक्षीकाम केलेल्या उंच अधिष्ठानावर नाथ नंगे महाराजांची काळ्या पाषाणात घडविलेली तेजस्वी मूर्ती प्रतिष्ठापित आहे. त्यांच्या मस्तकी चांदीचा नक्षीदार मुकुट आणि वरच्या बाजूला चांदीचे छत्र आहे.